नागपूर :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दीनदयालनगर प्रभात शाखा व दीनदयालनगर समुत्कर्ष संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी श्रीपांडुरंगेश्वर शिव मंदिर सभागृहात महापालिकेच्या सफाई कामगारांसाठी दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी २० महिला व पुरुष सफाई कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन शाखेचे मुख्य शिक्षक अमोल पाठक यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि मुद्दे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वयंसेवक चंद्रकांत गाडगे होते. प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष व शाखेचे स्वयंसेवक दिलीप कातरकर यांची होती. त्यांनी सफाई कामगारांच्या कार्याचा गौरव करून समाजाच्या स्वच्छतेमध्ये त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. सामाजिक समरसता आणि समाजातील सर्व घटकांमध्ये स्नेहभाव वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
सन्मान आणि उपस्थित व्यक्ती
याप्रसंगी सफाई कामगारांना दिवाळी फराळ व मानधन देऊन सन्मानित करण्यात आले. कामगारांतर्फे महिंद्र सुभाष बैस आणि रेणुका धर्मकाल यांनी मनोगत व्यक्त केले. आयोजनासाठी शाखा कार्यवाह अजय तेलंग, संस्थेचे कोषाध्यक्ष मुरलीधर कुर्हेकर, मंदिर व्यवस्थापन मंडळाचे राजीव भूत, राजेंद्र कोहळे आणि प्रकाश कावळे यांनी सहकार्य केले. यावेळी वस्तीतील नागरिक, स्वयंसेवक तसेच ज्येष्ठ स्वयंसेवक अॅड. बाळासाहेब आसरकर उपस्थित होते.



