सोनेगावात रस्ता फोडल्याने संताप

नागपूर : 

सोनेगाव तलाव ते विमानतळ मार्गावरील नव्याने बांधण्यात आलेला सिमेंट रस्ता पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी फोडण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून तयार झालेला रस्ता अल्पावधीतच खोदल्याने नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पाईपलाईनचे काम रस्ता बांधण्यापूर्वीच करण्यात आले असते तर सार्वजनिक निधीची बचत झाली असती. रस्ता फोडल्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे, तसेच नियोजनातील त्रुटींची चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.