नागपूर,

 बेसा-पिपळा परिसरातील पिरॅमिड गोल्ड सोसायटीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत वस्त्रदान उपक्रम राबविण्यात आला. 5 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित केलेल्या या उपक्रमात सोसायटीतील रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात कपडे जमा केले.

संकलित करण्यात आलेल्या कपड्यांचे आस्था पुरुष निवारा केंद्र, कॉटन मार्केट आणि शांती सदन महिला निवारा केंद्र, सदर येथे दान करण्यात आले. अशा उपक्रमांतून समाजातील गरजू घटकांना मदत करण्यासोबतच सामाजिक एकोपा आणि माणुसकीची भावना अधिक दृढ होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या उपक्रमातून गरजू पुरुष आणि महिलांना कपड्यांच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला. रहिवाशांच्या छोट्याशा योगदानातून गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. सामाजिक जाणीव आणि सहकार्याची भावना जोपासणाऱ्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.या उपक्रमासाठी विजय सोनटक्के, वीरेंद्र जोगी, दीपक पराशर, गौतम नागरे यांच्यासह पिरॅमिड गोल्डचे रहिवासी व निवारा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.