नागपूर

 शहरातील घटते हरित क्षेत्र आणि वाढते तापमान लक्षात घेता जलसंधारण व वृक्षसंवर्धनासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जलकार्यकर्ते व पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रवीण डबली यांनी मनपा आयुक्त डॉ. विपिन इतनकर यांना निवेदन देऊन केली.नागपूरमधील हरित क्षेत्र २०१५ मधील २१.३९ टक्क्यांवरून २०२५ मध्ये ९.६९ टक्क्यांवर आल्याचे डॉ. डबली यांनी नमूद केले. केवळ वृक्षारोपण न करता झाडांच्या संगोपनासाठी भूजल पातळी वाढविणे आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक विहिरी व तलावांचे संरक्षण करण्यासाठी ‘एक संस्था–एक विहीर/तलाव’ योजना राबवावी, नवीन इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करावे आणि झाडांच्या संगोपनाची जबाबदारी निश्चित करावी, अशा सूचना त्यांनी मांडल्या.शहरात सुमारे चार हजार ठिकाणी रस्त्यालगत पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची व्यवस्था विकसित करण्याचा निर्णय घेतल्याचे आयुक्तांनी बैठकीत सांगितले. तसेच पांढराबोडी तलावाच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉ. डबली यांच्या सूचनांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.