नागपूर:
अंकुर प्री-स्कूलमध्ये दसरा अर्थात विजयादशमीचा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीतील सणांचे महत्त्व मुलांना समजावे आणि त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, या उद्देशाने विविध कथा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना प्रभू श्रीराम आणि रावण यांच्या युद्धाची कथा सांगण्यात आली. श्रीरामांनी आपल्या शौर्याने आणि वानरसेनेच्या साहाय्याने दुराचारी रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळविला. हा विजयाचा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो, याची माहिती मुलांना देण्यात आली. तसेच महिषासुर या राक्षसाच्या अत्याचारांपासून सर्वांना मुक्त करण्यासाठी दुर्गादेवीने त्याचा वध केला, ही कथाही मुलांना सांगण्यात आली.
या कथांमधून सत्याचा विजय, धैर्य, शौर्य आणि संघटित शक्तीचे महत्त्व मुलांना समजावून सांगण्यात आले. सर्व मुलांनी एकत्र येत फेर धरून गरबा नृत्य सादर केले. रंगतदार गरबा नृत्यामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पारंपरिक सणाची माहिती, कथाकथन आणि नृत्याच्या माध्यमातून मुलांनी दसरा सणाचा आनंद घेतला.
अशा उपक्रमांमुळे मुलांना भारतीय संस्कृती आणि परंपरांची ओळख होण्यास मदत झाली.



