नागपूर:
श्रद्धानंद पेठ येथील श्री हनुमान मंदिर सेवा समितीतर्फे श्रावण महिन्यानिमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथेचा भक्तिमय वातावरणात समारोप झाला. ह.भ.प. सौ. मोहिनी देवपूजारी यांनी महिनाभर आपल्या भावपूर्ण वाणीने भागवत कथेतील विविध प्रसंग उलगडून सांगितले.
कथेतील प्रमुख प्रसंगांमध्ये हरिश्चंद्राची कथा, सुदाम्याची भक्ती, तसेच श्रीकृष्णाच्या मथुरागमनावेळी गोकुळ-वृंदावनवासीयांचा विरह यांचा समावेश होता. या प्रसंगांनी श्रोते भावुक झाले आणि त्यांच्या कथनातून भक्ती, प्रेम आणि जीवनमूल्यांचा संदेश मिळाला.
समारोपप्रसंगी तृप्ती आकांत, कांचन टेंभेकर, संध्या सैनीस व अभय चोरघडे यांनी मनोगत व्यक्त करून मोहिनी ताईंच्या कथनाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्रीकांत पांडे, नीलिमा पांडे, रश्मी जोशी, अंजली चोरघडे, वनिता काकडे, प्रवीण जोशी, महेंद्र आकांत, भूषण टेंभेकर, अरुण काकडे व शरद सैनीस यांचे सहकार्य लाभले.
महिनाभर भाविकांनी स्वेच्छेने प्रसादाची जबाबदारी स्वीकारत कार्यक्रमात सहभाग नोंदविला. याबद्दल मंदिर सेवा समितीतर्फे सर्व भाविक व सहकार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले.


