नागपूर -

 छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास, त्यांचे अतुलनीय शौर्य आणि स्वराज्याच्या स्थापनेसाठी उभारलेल्या गडकिल्ल्यांचा गौरवशाली वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हावरापेठ येथे सुवर्णदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली आहे. दिवाळीच्या निमित्ताने किल्ले बनविण्याची महाराष्ट्राची समृद्ध परंपरा जपत इतिहासाविषयीची आवड बालमनात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पवन लुटे आणि कार्तिका लुटे या दाम्पत्याने केले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक उपक्रमाचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.

पवन लुटे आणि कार्तिका लुटे हे दाम्पत्य मागील अनेक वर्षांपासून आपल्या निवासस्थानी शिवरायांच्या इतिहासाची आठवण करून देणाऱ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याची परंपरा जपत आहे. यंदाही त्यांनी माती, दगड आणि विटांचा कल्पकतेने वापर करून सुवर्णदुर्ग किल्ल्याची सुंदर प्रतिकृती उभारली आहे. किल्ल्याच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान असून, त्यावर डौलाने फडकणारा भगवा ध्वज स्वराज्याचा अभिमान आणि अस्मितेचे प्रतीक ठरत आहे.किल्ल्याची रचना, त्यातील बारकावे आणि केलेले सुबक सौंदर्यीकरण पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या उपक्रमाला यश मोरे, अथांग गटलेवार, पारश लांडे, तुषार घोडमारे आणि रियांश या बालकांनीही उत्स्फूर्त सहकार्य केले.