नागपूर,
ज्योतिबा माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा अभिजात सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ‘दान पावलं हो फाउंडेशन’तर्फे ‘अवयवदान हे श्रेष्ठ दान’ हा संदेश देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेतील भारुड या कलाप्रकाराच्या माध्यमातून अनघा वेखंडे यांनी अवयवदान आणि देहदानाचे महत्त्व मनोरंजक व प्रभावी पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडले. लोककलेच्या सादरीकरणातून सामाजिक जाणीव जागृत करण्यासोबतच मराठी भाषेचे अभिजात स्वरूप आणि लोकपरंपरेतील तिचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अवयवदान व देहदानाविषयी माहिती मिळाली, तसेच मराठी लोककलेचा प्रभावी अनुभव घेता आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या अरुणा कडू होत्या. अतिथी म्हणून अरुण वेखंडे, शोभा बावनकर आणि रेखा भारद्वाज उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मराठी भाषेचा गौरव आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.



