नागपूर:
ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भाच्या वतीने हनुमाननगर येथील ज्येष्ठ विरंगुळा केंद्रात कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात ऑक्टोबर महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन सचिव अशोक भुताड यांनी केले. यावेळी हेमराज वैद्य यांनी कोजागिरीच्या आध्यात्मिक महत्त्वावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्षत्व ॲड. अविनाश तेलंग यांनी केले, ज्यांनी ज्येष्ठ नागरिकांना निरोगी व आनंदी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
या विशेष कार्यक्रमात पाच पांडव मैत्री संगीत ग्रुप आणि इतर गायकांनी भक्तिगीते व जुन्या अजरामर गीतांची मेजवानी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. राजश्री अंबारे यांनी सूत्रसंचालन केले, तर श्याम पातूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विनोद व्यवहारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.



