जैन धर्मात दीपावली पर्वाला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. कार्तिक अमावस्येच्या दिवशी बिहारमधील पावापुरी येथे भगवान महावीर स्वामी यांनी निर्वाण प्राप्त केले. त्यांच्या निर्वाणाच्या स्मरणार्थ जैन बांधव दीपोत्सव साजरा करतात.भगवान महावीर हे जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर होते. त्यांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या पंचमहाव्रतांचा संदेश दिला. तसेच सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र या त्रिरत्नांच्या माध्यमातून मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखविला.केवलज्ञान प्राप्त करून भगवान महावीरांनी संपूर्ण मानवजातीला आत्मशुद्धी, संयम, करुणा आणि अहिंसेची शिकवण दिली.
जैन समाजात दीपावलीनिमित्त मंदिरांमध्ये पूजा-अर्चना, दीपप्रज्वलन आणि निर्वाण लाडू अर्पण केले जातात. भगवान महावीरांचा अहिंसा आणि आत्मकल्याणाचा संदेश आजही समाजाला शांती, बंधुता आणि सदाचाराची प्रेरणा देत आहे.



