नागपूर:
सेवा सर्वदा बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित सहाव्या स्लम महोत्सवात नागपूरमधील आठ वस्त्यांतील ८३ विद्यार्थ्यांनी नृत्य आणि फॅशन शोच्या माध्यमातून आपले कलागुण सादर केले. विद्यार्थ्यांच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
महोत्सवाचे उद्घाटन बाल कला अकादमीच्या अध्यक्षा मधुरा गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी रूपाली काळे, सुनेत्रा बडकस व नरेंद्र ढवळे उपस्थित होते. गेल्या १९ वर्षांपासून संस्था वस्त्यांमध्ये शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे.डॉ. संदीप तुंडुरवार यांनी सांगितले की, "मुलांमधील कलागुणांना व्यासपीठ देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे." यावेळी क्रीडा विजेत्यांचा गौरव करण्यात आला. खुशाल ढाक यांनी आभार मानले.



