नागपूर: महिला कला निकेतनद्वारा संचालित अंकुर प्री स्कूलमध्ये पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांचा खरा मित्र असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो, याचे महत्त्व सांगण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बैलांना गेरू, बेगड, फुलांच्या माळा व घुंगरूंनी सजविले. काही विद्यार्थी शेतकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले. संस्थेच्या पदाधिकारी सौ. सुनिती अनगळ, आरती आठवले तसेच शिक्षिकांनी बैलांची पूजा केली. त्यानंतर तोरण बांधून पोळा भरविण्यात आला व बैलांची शर्यत घेण्यात आली.
विद्यार्थ्यांना डाळ-काकडीचा प्रसाद देण्यात आला. सजविलेल्या बैलांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. हा सण विद्यार्थ्यांसाठी एक विशेष अनुभव होता, ज्यामुळे त्यांना आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल अधिक माहिती मिळाली.



