इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एआय युगातील ग्रंथालय व्यवस्थापन व त्यातील आव्हाने यावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळा इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लेक्चर हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राज गजभिये, अतिरिक्त सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण व अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, डॉ. रवी चव्हाण, अधिष्ठाता, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर व डॉ. भावना सोनवणे, ग्रंथालय समिती अध्यक्ष तथा विभागप्रमुख, क्ष-किरण विभाग, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांच्या उपस्थित संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सीमा व्यास (माजी ग्रंथपाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर), श्री. संजय केमकर (माजी ग्रंथपाल, शासकीय दंत महाविद्यालय, मुंबई) व डॉ. मंजू दुबे, ग्रंथपाल व सहयोगी प्राध्यापक, आर. एस. मुंडले धरमपेठ कॉलेज, नागपूर या व्यासपीठावर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलित करून ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन व विद्येची देवी सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

कार्यशाळेचा मुख्य उद्देश

कार्यशाळेचा मुख्य उद्देश म्हणजे एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी ग्रंथपालन पद्धतीसाठी कसा उपयोग करता येईल, वैद्यकीय क्षेत्रात एआयच्या युगात ग्रंथपालांची भूमिका काय असावी, तसेच विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अचूक व विश्वासार्ह माहिती कशा प्रकारे पुरवावी याबाबत मार्गदर्शन करणे. डॉ. मंजू दुबे यांनी या विषयावर सविस्तर माहिती दिली.

चर्चासत्र आणि निष्कर्ष

कार्यशाळेच्या अंतिम सत्रामध्ये ग्रंथालय कर्मचाऱ्यांना दैनंदिन काम करताना भेडसावणाऱ्या समस्या व अडचणी यावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. उपस्थित ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी आपले प्रश्न मांडले. आयोजन समितीमार्फत हे प्रश्न आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्याकडे पाठविण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.

विशेष विषयांवर चर्चा

कार्यशाळेत ग्रंथालयातील पुस्तक व नियतकालिकांच्या खरेदी प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. डॉ. सीमा व्यास व श्री. संजय केमकर यांनी या विषयावर सखोल चर्चा केली.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. रवींद्र सोंडे, श्रीमती प्रिया गोडघाटे, श्रीमती अंजिता गजघाटे, श्री. रंजीत कांबळे, श्री. गोपाल राठोड, श्री मंगेश कांबळे, श्री विजय बोंगारे, श्री अजय गीते, व प्रणोती राखुंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शितल सहारे व श्रीमती प्रियंका चव्हाण यांनी केले. ग्रंथपाल व कार्यशाळा आयोजक श्री. नितीन गजघाटे यांनी आभार मानले.

या ऐतिहासिक प्रथम कार्यशाळेस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ग्रंथपाल व ग्रंथालय कर्मचाऱ्यांची विक्रमी उपस्थिती लाभली.