वर्मा लेआउटमध्ये रोज भरते ‘पक्ष्यांची शाळा’
नागपूर
वर्मा लेआउट येथील प्लॉट क्रमांक ३२ वर दररोज सकाळी ५.४५ वाजता अनोखी ‘पक्ष्यांची शाळा’ भरते. वंदना घटवाई यांच्या गच्चीवर दाणे खाण्यासाठी पोपटांचे थवे, तब्बल ७० ते ८० चिमण्या, सुगरण यांसह विविध पक्ष्यांची लगबग पाहायला मिळते. विशेष म्हणजे, नागपुरात दुर्मिळ होत चाललेल्या सुगरण पक्ष्याचेही येथे नियमित दर्शन घडते.
गेल्या १० वर्षांपासून वंदना घटवाई पक्ष्यांसाठी दररोज सकाळी गच्चीवर दाणे-पाणी ठेवतात. त्यांच्या या सेवेमुळे परिसरातील पक्ष्यांचे हे ठिकाण जणू हक्काचे आश्रयस्थान बनले आहे. जंगलात जाऊन पक्षी पाहण्यापेक्षा त्यांच्या घरीच विविध पक्ष्यांचे सहज दर्शन घडते. या उपक्रमातून पक्षीप्रेमासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला जात आहे.



