कामठीमध्ये कबड्डी स्पर्धेत विजय
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत एस. के. पोरवाल कॉलेजच्या मुलींनी दमदार कामगिरी करत विजय मिळवला. ही स्पर्धा ९ सप्टेंबर रोजी एस. के. पोरवाल कॉलेजच्या मैदानावर झाली.
या स्पर्धेत विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थिनींच्या संघांनी सहभाग घेतला. एस. के. पोरवाल कॉलेजचा सामना प्रगती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कोराडीच्या संघाशी झाला. सामन्याच्या पहिल्या सत्रात प्रगती विद्यालयाच्या संघाने एका लोनच्या आघाडीने पोरवाल कॉलेजवर वर्चस्व मिळवले.
मध्यंतरानंतर एस. के. पोरवाल कॉलेजच्या खेळाडूंनी जोरदार पुनरागमन करत सामन्याचे पारडे फिरवले. देवी काटरपवार आणि खुशी कडनाईके यांनी उत्कृष्ट रेड करत संघाला आघाडी मिळवून दिली. अखेर पोरवाल कॉलेजच्या संघाने दहा गुणांनी विजय मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
संघाला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. मल्लिका नागपुरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वप्नील दहाट, उपप्राचार्य, पर्यवेक्षक मेंढे सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी संघाचे अभिनंदन करून आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



