कामठी -
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत कामठी येथील एस. के. पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी भव्या पोरवाल याने दमदार कामगिरी करत विजेतेपद मिळविले. या विजयासह त्याची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ही स्पर्धा १० सप्टेंबर २०२६ रोजी महानगरपालिका लॉन टेनिस कोर्ट, रामनगर येथे झाली. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भव्या पोरवाल याने माउंट लिटेरा झी स्कूल, बेसा, नागपूर येथील विराट पांडे याचा ३-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात त्याची लढत दिल्ली पब्लिक स्कूल, लावा येथील आलोक मिश्रा याच्याशी झाली.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात भव्या पोरवाल याने सुपर टायब्रेकमध्ये १०-४ असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले. भव्या याला प्रा. डॉ. मल्लिका नागपुरे यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वप्नील दहाट, उपप्राचार्य व्ही. बी. वंजारी, पर्यवेक्षक नरेंद्र मेंढे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भव्या पोरवालचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



