नागपूर: 

मतिमंद व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत संज्ञा संवर्धन संस्थेचा ३३ वा वार्षिकोत्सव मुंडले सभागृहात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रामकृष्ण मठ, धंतोलीचे स्वामी राघवेंद्र नंदजी, तर अध्यक्षस्थानी एम. एम. पी. इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रबंधक व व्यवस्थापकीय संचालक अरुण भंडारी उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मान्यवरांचे स्वागत व परिचयानंतर स्वागतगीत सादर करण्यात आले. स्वामी राघवेंद्र नंदजी यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले व समाजाने संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

‘काल, आज और कल’ या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम कल्पतरू विशेष शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केला. नृत्य, लोककला, भारूड, देशभक्तिपर गीते, पर्यावरणविषयक सादरीकरण आणि नाटिकांनी उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी संस्थेचे सचिव डॉ. उत्तरवार यांनी वार्षिक अहवाल सादर केला. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र सावजी यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, पालक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.