नागपूर : 

गुरुदेव सेवा मंडळ आणि हावरापेठ काकड आरती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती हनुमान मंदिर, हावरापेठ येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५८ वी पुण्यतिथी विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. ३ नोव्हेंबर रोजी पहाटे मंदिर परिसर सुशोभित करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

त्यानंतर काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे व अधिष्ठानाचे पूजन तुळशीराम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲड. रमेश गवळी, धनराज बुटले, बाळकृष्ण हातागडे, मोरेश्वर बांगडे आणि हरिदास खंडार उपस्थित होते.कार्यक्रमात सामुदायिक ध्यानसाधना, सामूहिक ग्रामगीता पठण आणि भजनगायनाचे आयोजन करण्यात आले. ध्यानसाधने दरम्यान उपस्थित भाविक आध्यात्मिक वातावरणात तल्लीन झाले होते.

याप्रसंगी ग्रामगीता प्रचारक मीरा मोतीकर यांनी ध्यानसाधना व नामजप या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, नामजपामुळे हृदय शुद्ध होते, दिव्य प्रेम जागृत होते आणि परमेश्वर सर्वत्र उपस्थित असल्याची अनुभूती मिळते. या साधनेमुळे जीवनात शांती व समाधान प्राप्त होते.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी उभे राहून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर आरती आणि प्रसादाचे वितरण करण्यात आले.