नागपूरच्या इंद्रनगर येथील श्री सर्वेश्वर संकटमोचन हनुमान मंदिराने गोंधळी परंपरेला नवा श्वास दिला आहे. आज, २४ सप्टेंबर २५ रोजी, श्री सर्वेश्वर संकटमोचन हनुमान सेवा समितीच्या वतीने आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवात गोंधळ कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमात श्री गोवर्धन बडगे आणि त्यांच्या गोंधळी सहकार्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
संपूर्ण महाराष्ट्रात, आधुनिक काळात ऑर्केस्ट्रा आणि डीजेच्या आवाजात पारंपरिक गोंधळ परंपरा हरवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर, मंदिर समितीने गोंधळ कार्यक्रम आयोजित करून एक महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. देवीसमोर गोंधळ घालणे म्हणजे देवीची प्रसन्नता मिळविण्याचा मार्ग मानला जातो, आणि या परंपरेचा जपण्यासाठी समितीचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
गोंधळी परंपरा ही महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा आणि देवी उपासनेचा अविभाज्य भाग आहे. या उपक्रमामुळे परिसरातील तरुण पिढीलाही आपल्या पारंपरिक संस्कृतीचे भान राहील आणि समाजात एकोपा वृद्धिंगत होईल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.



